मलकापुरात राकेश तलरेजा यांच्यावर ॲसिड हल्ला; डोळ्यांना गंभीर इजा! सिंधी कॉलनीतील घरासमोरच हल्ला; हल्लेखोर दुचाकीवरून पसार, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू
हाक मारली अन् चेहऱ्यावर ॲसिड फेकले!
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश तलरेजा हे बुधवारी मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे देवी विसर्जनासाठी गेले होते. रात्री आठच्या सुमारास ते मलकापुरात परतले. हॉटेल सारथी येथे चारचाकी वाहनातून उतरून ते आपल्या घराकडे जात असताना सिंधी कॉलनीतील घरासमोर ही घटना घडली.
यावेळी दबा धरून बसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांना ‘राकेश’ अशी हाक मारली. तलरेजा यांनी मागे वळून पाहताच संबंधित व्यक्तीने जवळील बाटलीतील ॲसिड त्यांच्या चेहऱ्यावर फेकल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
चेहरा, खांदा, छातीसह डोळ्यांना गंभीर दुखापत
हल्ल्यानंतर तलरेजा यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रमंडळी घटनास्थळी धावून आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने आयुष्यमान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. चेतन जाधव यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. चेहरा, खांदा आणि छातीला झालेल्या दुखापतींसोबतच डोळ्यांनाही गंभीर इजा झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी जालन्यातील गणपती नेत्रालय येथे हलविण्यात आले.
पूर्वनियोजित हल्ल्याचा संशय; तीन जणांच्या सहभागाची चर्चा
तलरेजा यांच्यावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्यापूर्वी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून रेकी करण्यात आली असावी, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. या घटनेत तीन जण सहभागी असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, हल्ल्यातील व्यक्तींची नेमकी संख्या, त्यांची ओळख आणि हल्ल्यामागील कारण याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही. रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या राकेश तलरेजा यांच्यावर हल्ला करण्यामागचे नेमके कारण काय, याचा उलगडा होणे बाकी आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात
घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, शहरातील भरवस्तीत आणि घरासमोरच अशा प्रकारचा गंभीर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच तलरेजा यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजबांधवांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. हल्लेखोरांची ओळख, हल्ल्यामागील कारण आणि अन्य व्यक्तींचा सहभाग याबाबत मलकापूर शहर पोलिसांचा तपास सुरू आहे.