कोलवड येथील शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी पुण्यातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  कोलवड येथील एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून गजाआड केले.  
कोलवड येथील एका शेतकर्यावर प्राणघातक हल्ला करून दोन आरोपी पसार झाले होते. या आरोपीविरुध्द बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात  कलम 109(1), 115(2), 352, 351(3), 3(5) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांना हवे असलेल्या या आरोपींचा   शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  सुनिल अंबुलकर यांना दिले होते. त्यानुसार तात्काळ विशेष पथक गठित करून शोधमोहीम राबविण्यात आली.

दि. 20 जानेवारी 2026 रोजी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी  सुरज मोतीराम पसरटे (वय 23, रा. विजयनगर, सुंदरखेड, ता. जि. बुलढाणा) व आदेश सुनिल राठोड (वय 22, रा. क्रीडा संकुल रोड, आय.टी.आय. कॉलनी, बुलढाणा) हे पुणे शहरातील वाघोली परिसरातील अक्षय संस्कृती अपार्टमेंट, बायफ रोड येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर पुढील तपासकामी त्यांना पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे हजर करण्यात आले आहे.


ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, चाँद शेख, गणेश पाटील, पोकाॅ गजानन गोरले, चापोकाॅ निवृत्ती पुंड तसेच TAW चे पोहेकॉ राजू आडवे व पवन मखमले यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.