देऊळगाव राजा–चिखली महामार्गावर भीषण अपघात; दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अंत्री खेडेकर येथील रोहन कैलास माळेकर (वय २१) हे दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या रामनगर येथील भिका शितोळे (वय ५०) यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, रोहन माळेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर भिका शितोळे हे गंभीर जखमी झाले.
हा अपघात देऊळगाव राजा–चिखली महामार्गावरील रामनगर फाट्यालगत असलेल्या आठवण ढाबा परिसरात घडला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.
माहिती मिळताच ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी बिट जमादार पोफळे व पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून दोघांनाही पुढील उपचारांसाठी चिखली येथील रुग्णालयात हलविले. दरम्यान, रोहन माळेकर यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.