वारी भैरवगड येथे दुर्घटना ! २३ वर्षीय युवकाचा डोहात बुडून मृत्यू...

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वारी भैरवगड या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री हनुमान मंदिराजवळील डोहात बुडून एका २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव अक्षय सिद्धार्थ भोजने (रा. अकोला) असे आहे.

अक्षय भोजने हा आपल्या मित्रांसोबत वारी भैरवगड येथे हनुमान मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आला होता. दर्शनानंतर, मंदिरालगतच्या नदीतील राजण्या डोहात पोहण्यासाठी तो उतरला. मात्र, उंचावरून उडी मारताना त्याच्या डोक्याला जोराची धडक बसली आणि तो बेशुद्ध अवस्थेत पाण्यात बुडाला.
घटनेनंतर त्याच्या मित्रांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. काही वेळाच्या शोधानंतर स्थानिक नागरिकांनी अक्षयचा मृतदेह डोहातून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी अनमोल भोजने यांच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.