लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर एसीबीची कारवाई; मलकापूर एमआयडीसीतील पोहेकॉ वैदकरविरुद्ध गुन्हा दाखल!

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :अपघातप्रकरणात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार (पोहेकॉ) सतिष रतन वैदकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, मलकापूर–मुक्ताईनगर रोडवरील दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अपघात झाला होता. या अपघातातील गाडी मालक या नात्याने तक्रारदारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोहेकॉ वैदकर यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

या तक्रारीवरून २७ सप्टेंबर रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता, वैदकर यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपये मागणी करून १० हजार रुपयांवर तडजोड केली आणि ती रक्कम आणण्यास सांगितली.
त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाई करण्यात आली. मात्र, तक्रारदारावर संशय आल्याने वैदकर यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही. तरीदेखील, लाच मागणी सिद्ध झाल्याने त्यांच्या विरोधात एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३९/२०२५ कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे आणि अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा पथकाने केली.