आईसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला मालवाहू वाहनाची जोरदार धडक; मुलाचा मृत्यू, आई मृत्यूशी झुंजतेय! मेहकरजवळ भीषण अपघाताने हळहळ; जखमी आईवर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू...

 
मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आईसोबत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला! समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. ही हृदयद्रावक घटना शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मेहकर येथील कंचणी महाल परिसरात घडली. अपघातातील जखमी आईची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाचे नाव दत्तात्रय वसुदेव दहातोंडे (रा. कोयाळी दहातोंडे, ता. लोणार) असे असून, गंभीर जखमी आईचे नाव रत्नमाला वसुदेव दहातोंडे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय हा आई रत्नमाला यांच्यासोबत दुचाकीने (एमएच २८ पी ७६८९) मेहकरहून जानेफळकडे जात होता. दरम्यान, जानेफळकडून मेहकरच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच ३७ टी ४३३३) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील मायलेक दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी मेहकर येथे दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दुर्दैवाने जालना येथे पोहोचेपर्यंत दत्तात्रय याचा मृत्यू झाला. त्याची आई रत्नमाला यांच्यावर जालना येथे प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.एकाच अपघातात मुलाचा मृत्यू आणि आई गंभीर जखमी झाल्याने दहातोंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे कोयाळी दहातोंडे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.