घरासमोर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला उचलून घेऊन निघाली महिला! शेजारच्या महिलेने पाहिले अन् धाव घेतली; प्रसंगावधानामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला! मलकापुरात खळबळ...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरासमोर खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला एक अनोळखी महिला सोबत घेऊन निघाली... मात्र, शेजारी राहणाऱ्या महिलेच्या सतर्क नजरेतून हा प्रकार सुटला नाही! तिने क्षणाचाही विलंब न करता धाव घेत संबंधित महिलेला हटकले अन् चिमुकल्याला पळवून नेण्याचा कथित प्रयत्न फसला. मलकापूर शहरातील पारपेठ भागातील मुस्ताक अली नगर परिसरात शनिवारी (२१ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्ताक अली नगर येथील रहिवासी शेख सादिक शेख बशीर यांचा दोन वर्षांचा मुलगा शेख नोमान हा शनिवारी सायंकाळी घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. याचवेळी एक अनोळखी महिला तेथे आली. तिने घरातील कोणालाही काहीही न सांगता चिमुकल्या नोमानला सोबत घेऊन जाण्यास सुरुवात केली. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या तानियाबी यांचे या प्रकाराकडे लक्ष गेले. अनोळखी महिला लहान मुलाला घेऊन जात असल्याचे पाहून त्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ धाव घेत संबंधित महिलेला अडवले आणि विचारपूस सुरू केली. यावेळी महिलेने आपले नाव शबनम खानम (रा. ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर, पारपेठ, मलकापूर) असे सांगितले. मात्र, तानियाबी यांनी विचारपूस करताच संबंधित महिलेने तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तानियाबी यांच्या प्रसंगावधानामुळे चिमुकला नोमान सुरक्षित राहिला. या घटनेनंतर शेख सादिक शेख बशीर यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शबनम खानम हिच्याविरुद्ध अपराध क्रमांक ८९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) आणि ६२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.

शेजारच्या तानियाबी ठरल्या चिमुकल्यासाठी देवदूत!

अवघ्या दोन वर्षांच्या नोमानला अनोळखी महिला घेऊन जात असल्याचे वेळीच लक्षात आल्याने संभाव्य अनर्थ टळला. तानियाबी यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चिमुकला सुरक्षित राहिला. या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांकडेही पालकांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.