बुलडाणा "एलसीबी" ची दमदार कारवाई! तार चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास! ३ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एलसीबी पथक गुन्ह्यांची उकल करण्यात यशस्वी होत आहे. अतिशय किचकट गुन्ह्यांचा तपास बुलडाणा एलसीबने पूर्णत्वास नेला आहे. आता विद्युत खांबावरील ॲल्युमिनियम तार चोरीच्या प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला तब्बल तीन लाख चार हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे..

    विद्युत खांबावरील तार चोरीच्या अनेक घटना जिल्ह्यातील विविध भागातून समोर आल्या होत्या; दरम्यान, जळगांव जामोद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू असताना ३ आरोपी निष्पन्न झाले. भारतीय विद्युत कायद्यानुसार सदरची कारवाई करण्यात आली. संतोष पावरा, बेलरसिंग पावरा, शेख सईद ( तिघेही रा. पिंपळगांव काळे, ता. जळगांव जा.) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपीतांकडून तार चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे. आरोपी सरकारी विद्युत खांबांवरील कामाच्या ठिकाणी पडून असलेल्या अल्युमिनीयम चोरी करायचे व त्यानंतर भंगार दुकानदारांना विकत होते.
सोने चांदीच्या मुद्देमालासह एसीई कंपनीची चार चाकी किंमत ३ लाख रुपये, चोरी केलेली ३५ किलो वजनाची तार (किंमत ४६२०) असा एकूण ३ लाख ४ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
 
 कारवाई पथक..
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, बी. बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सपोनि यशोदा कणसे, पोहेको, एजाज खान, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोकों, गोपाल तारुळकर, चालक पोकॉं शिवानंद हेलगे यांनी केली.