बुलडाणा शहर पोलिसांची दमदार कामगिरी! २४ तासांच्या आत ४ भामट्यांना पकडले; करत होते मोठे कांड; ३ भामटे उदयनगचे,एक सागवनचा..
Oct 8, 2024, 10:40 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील बस स्टॅन्ड कॉम्प्लेक्समधील मोबाईल शॉप चे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना ६ ऑक्टोबरला घडली होती. दरम्यान बुलडाणा शहर पोलिसांनी अतिशय पद्धतशीरपणे चोरट्यांचा करेक्ट कार्यक्रम लावला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत ४ भामट्यांना पकडले आहे.
भागवत गोविंदा राऊत (२१, रा. शिवाजी चौक उदयनगर), ऋषिकेश शालीकराम जाधव(२०, रा. सुंदरखेड बुलडाणा, हमु, उदयनगर), आकाश रामदास काळे(२२, उदयनगर), अनिकेत नारायण हरकल (२५, रा. सागवन, बुलडाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून त्यांनी चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बुलडाणा बसस्थानकावरील माऊली मोबाईल शॉप फोडून या भामट्यांनी मोबाईल, हेडफोन व रोख १८ हजार असा ३४ हजारांचा मुद्देमाल गायब केला होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या आदेशाने सहाय्यक फौजदार शशिकांत धारकरी, पोहेकॉ सुनिल किनगे, नापोकॉ सुनील मोझे, पोकॉ. युवराज शिंदे, पोकॉ विनोद बोरे, पोकॉ गणेश टेकाळे यांनी केली.