शेतातील पत्र्याच्या गोठ्यात चक्क गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा! आठ तास पाळत ठेवली, बनावट रुग्ण पाठवली अन् रंगेहात पकडले;
बुलढाण्यात बोगस डॉक्टरसह तिघांचे बिंग फुटले! तीन जिल्ह्यांच्या आरोग्य पथकाची धडाकेबाज कारवाई...
अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणा सतर्क झाली होती. संशयित डॉक्टरच्या हालचालींवर पथकाने तब्बल आठ तास बारकाईने लक्ष ठेवले. कोणतीही घाई न करता अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची आखणी करण्यात आली. त्यानंतर बनावट रुग्णाच्या (डिकॉय केस) माध्यमातून सापळा रचण्यात आला. संशयितांकडून गर्भलिंग निदानाचा बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे समोर येताच संयुक्त पथकाने थेट छापा टाकला. विशेष म्हणजे, कोणत्याही अधिकृत रुग्णालयात किंवा सोनोग्राफी केंद्रात नव्हे, तर शेतातील पत्र्याच्या गोठ्यात हा प्रकार सुरू असल्याचे उघड झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीन; तपासणीसाठी येणाऱ्या महिला कोण?
या कारवाईदरम्यान पथकाने पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि संबंधित साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी बोगस डॉक्टरसह तिघांविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता? गर्भलिंग निदानासाठी महिलांना या निर्जन ठिकाणी कोण आणत होते? त्यासाठी किती पैसे उकळले जात होते? या बेकायदेशीर व्यवसायात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेषतः तीन जिल्ह्यांच्या आरोग्य विभागाला संयुक्त कारवाई करावी लागल्याने या प्रकाराची व्याप्ती नेमकी किती आहे, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
मुलगी वाचवण्याच्या मोहिमेला काळिमा; रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत?
एकीकडे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा संदेश देत मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. दुसरीकडे मात्र गर्भलिंग निदानासारखे बेकायदेशीर प्रकार छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार गर्भलिंग निवड आणि गर्भलिंग निदान करण्यास सक्त मनाई आहे. अशा प्रकारांमुळे स्त्रीभ्रूणहत्येला खतपाणी मिळण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. आता या प्रकरणातील संशयितांचे आणखी कोणाशी संबंध आहेत, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कुठून आणण्यात आले आणि या अवैध व्यवसायामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा छडा लावण्याचे आव्हान पोलीस आणि आरोग्य विभागासमोर आहे. पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.