मतदारांना पैसे वाटणाऱ्या अज्ञात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा; खामगावात मतदानाच्या आधल्या दिवशी पथकाने जप्त केले होते 50 हजार रुपये...

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करण्याचा प्रयत्न भरारी पथकांच्या सजगतेने खामगावात फसला होता. पथकाला पाहून वाटपासाठी आणलेली ५० हजारांची रोकड सोडून अज्ञात तिघांनी पोबारा केल्याची घटना मतदानाच्या पूर्वरात्री स्थानिक महेबूब नगरात घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
स्थानीय महेबूब नगरात मतदारांना वाटप करण्यासाठी ५० हजारांची रोकड आणल्याची माहिती निवडणूक आचारसंहिता नोडल अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आणि तलाठी नागरे यांच्या द्विसदस्यीय भरारी पथकाला मिळाली होती. पथकाने तत्काळ छापा टाकला असता, घटनास्थळी ५० हजारांची रोकड आढळली. मात्र, हे पैसे सोडून अज्ञात तिघांनी पळ काढला.नोडल अधिकारी व्यवहारे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १२३(क) तसेच भारतीय न्यायसंहिता कलम १७०, १७१ आणि १७३ अंतर्गत अज्ञात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी, न्यायालयाची परवानगी घेऊन, योग्य ती कारवाई करण्याकरिता तपास पोहेकॉ जावेद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.