

५७ हजारांचे कर्ज; शेतमालाला नाही भाव! शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल! पिंपळगाव सराईत हळहळ....
Updated: Mar 8, 2025, 08:56 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून पिंपळगाव सराई येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ मार्च रोजी उघडकीस आली. प्रभाकर खेनते असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
पिंपळगाव सराई येथील शेतकरी प्रभाकर खेनते यांच्याकडे दीड एकर जमीन होती आणि त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे ५७ हजार रुपयांचे पीक कर्ज होते. गेल्या तीन वर्षांपासून शेतीचे उत्पन्न घटत असल्याने आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची गावामध्ये सांगण्यात येत आहे. प्रभाकर खेनते यांनी झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांचा भाऊ गजानन खेनते यांनी रायपूर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल केली. मृतक प्रभाकर खेनते यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि मुलगा आहे.