वादळी वाऱ्यामुळे विजेची तार झाडाला लागली! झाडाला बांधलेल्या गाईचा मृत्यू, महिला जखमी

 
 देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथे आज पावणे दोन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे विजेच्या पावर लाईनचा झाडाशी संपर्क आला. या घटनेत झाडाला बांधलेली गाय जागीच ठार झाली असून शेतात काम करणाऱ्या महिलेचा विजेचा धक्का लागून ती जखमी झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर सखाराम बुरकुल यांच्या शेतातून दुसरबीड ते अंभोरा (वडसखेड) अशी पावर लाईन जात असून आज वाऱ्याच्या झोतामुळे ती शेतातील झाडाला लागली. त्या झाडाला बांधलेली गाय विजेचा धक्का बसून जागीच ठार झाली. यावेळी शेतात काम करत असलेल्या गयाबाई सखाराम बुरकुल या देखील विजेच्या धक्क्याने जखमी झाल्या आहेत.  
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्याची मागणी होत आहे.