कर्जाच्या विळख्यात शेतकऱ्याची जीवनयात्रा संपली!राहेरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची धरणात उडी घेऊन आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर..

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील राहेरा येथील एका युवा शेतकऱ्याने धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी, १० मे रोजी सकाळी उघडकीस आली. बबन देविदास जाधव (वय ४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बबन जाधव हे राहेरा येथील अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या मालकीची अवघी अडीच एकर शेती असून शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी, वाढलेला शेती खर्च आणि उत्पादनाला न मिळणारा योग्य भाव यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच खाजगी पतसंस्था व इतर ठिकाणचे सुमारे पाच लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते.
कर्जाची परतफेड कशी करावी, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या चिंतेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. राहेरा शिवारातील एका धरणात उडी घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सकाळी सुमारे ८.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दुपारी २ वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न, वाढते कर्जबाजारीपण आणि शेतीसमोरील आर्थिक संकट ऐरणीवर आले आहे.