घरात चोरीचा धक्कादायक डाव! १ लाख २० हजारांचा ऐवज गायब; CCTV फुटेजने उलगडले संशयाचे धागे, घरकाम करणाऱ्या महिलेवर गुन्हा! नांदुऱ्याची घटना....

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील डागा ऑईल मिल परिसरातील घरातून तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ४५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची तुळशी मण्यांची माळ असा ऐवज असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात २२ ऑगस्ट रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेणु राकेश डागा यांच्या जेठाचे निधन झाल्याने कुटुंबीय विधीच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर ये-जा करीत होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर कपाटातील सामान तपासले असता ४५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच अंदाजे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची तुळशी मण्यांची माळ, किंमत सुमारे ७५ हजार रुपये, असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे निदर्शनास आले.चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर घरातील व्यक्तींनी तसेच घरकाम करणाऱ्या शारदा अनंता तायडे (रा. नांदुरा) हिच्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र, तिने चोरी केल्याचा आरोप नाकारला.

दरम्यान, घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता शारदा तायडे घरातील एका खोलीत जाताना आणि काही वेळाने बाहेर येताना फुटेजमध्ये दिसून येते. तिच्या हातातील कागदात पैशांचे बंडल असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.या प्रकरणी रेणु डागा यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी शारदा अनंता तायडे हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस अंमलदार सय्यद करीत आहेत. दरम्यान, चोरीचा ऐवज आणि घटनेमागील नेमके कारण याबाबत पोलिस तपासातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.