

EXCLUSIVE लोणार नकली नोटा प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांच्या भीतीने आरोपींनी जाळल्या नोटा; नोटा छापणारा कोण? पोलिसांच्या रडावर...
Apr 3, 2025, 20:29 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार मध्ये नकली नोटांचे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्धवस्त केल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्ह ने आज दुपारीच प्रसिद्ध केले होते. दरम्यान आता त्या वृत्तावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या स्वाक्षरीने या प्रकरणाची माहिती देणारे एक प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी काढले आहे..त्या प्रसिद्धी पत्रकात पोलिसांनी आरोपींच्या नावाची देखील माहिती दिली आहे.
लोणार मध्ये नकली नोटांच्या रॅकेट प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. काल या आरोपींची दहशतवाद विरोधी पथकाने देखील कसून चौकशी केली. आरोपींचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग आहे का? या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान पोलिसांच्या भीतीने अटकेपूर्वीच आरोपींनी काही नकली नोटा जाळून टाकल्याचे समोर आले आहे. जाळून टाकलेल्या नोटांची नेमकी रक्कम किती? याबद्दल नेमकी माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही..पोलिसांनी १०० रुपयांच्या १९ बनावट नोटा आतापर्यंत जप्त केल्या आहेत. याशिवाय नकली नोटा एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीला देण्यासाठी मिळालेले १० हजार रुपये कमिशन देखील आरोपींच्या ताब्यातून जप्त केले आहेत.
आरोपींची नावे...
मोईन खान,मोहम्मद अतिक मोहम्मद लुकमान (४१, नवी नगरी, लोणार), शेख लुकमान शेख कालू (५६,आझाद नगर ,लोणार), मुजाहिद अली मुमताज अली (२३, रोशनपुरा,लोणार) आणि अब्दुल रहीम अब्दुल रशीद(३५, रा. सुलतानपूर, ता.लोणार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीपैकी शेख लुकमान शेख कालू हा प्राध्यापक असून तो स्वतःला पत्रकार देखील म्हणवून घेतो..
नोटा छापणारा कोण?
दरम्यान आता पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. नोटा छापून त्या मार्केटमध्ये आणणारे आणखी एक रॅकेट अटकेतील आरोपींच्या चौकशीतून समोर येऊ शकते.