शेतकऱ्याची राेख रक्कम असलेली पिशवी केली लंपास; खामगाव शहरातील घटना; १.२७ लाख रुपये हाेते पिशवीत; आराेपी पसार..!
Sep 2, 2025, 18:03 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : फाेन आल्यानंतर बाहेर गेल्याची संधी साधत एका शेतकऱ्याची राेख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चाेरट्याने लंपास केली. ही घटना शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत ३० ऑगस्ट राेजी घडली. या पिशवीत शेतकऱ्याचे एक लाख २७ हजार रुपये हाेते. या प्रकरणी पाेलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खामगाव शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शिवदास सुखदेव घ्यार (५१, रा. किन्ही महादेव, ता. खामगाव) हे पैसे काढण्यासाठी आले हाेते. एकाने त्यांच्याकडे रोख रक्कम असलेली पिशवी सुपुर्द केली. त्यांनी ती पिशवी बँकेच्या काउंटरवर ठेवली होती. दरम्यान, फोन आल्याने ते बाहेर गेले असता, अंदाजे २० ते २१ वयोगटातील अज्ञात युवकाने पिशवी चोरून नेली. ही घटना सायंकाळी ४ वाजून ५१ मिनिटांपर्यंतच्या दरम्यान घडली. सोमवारी सायंकाळी खामगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३८० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.पुढील तपास खामगाव शहर पाेलीस करीत आहेत.