विश्वगंगा नदीच्या पात्रात मलकापूर येथील ३७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; भाविकांना खबरदारीचे आवाहन...

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नांदुरा तालुक्यातील प्रसिद्ध निंबा देवी संस्थान येथील दर्शनानंतर नदी पात्रात गेलेल्या मलकापूरच्या एका ३७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अतुल मनोहर बऱ्हाटे (वय ३७, रा. मुकुंद नगर, मलकापूर) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, मलकापूर येथून योगेश कृष्णा भोकरे, निलेश चिंतामण वानखडे, गोपाल शालिग्राम मेतकर आणि अतुल बऱ्हाटे हे दर्शनासाठी निंबा देवी संस्थान येथे आले होते. दर्शनानंतर सर्वजण हातपाय धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी शेजारच्या विश्वगंगा नदी पात्रातील खदानीजवळ गेले. यावेळी अतुल बऱ्हाटे यांनी पाण्यात उतरून अंघोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा योग्य अंदाज न आल्यामुळे ते खोल पाण्यात गेले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर योगेश कृष्णा भोकरे (रा. मलकापूर) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दिनांक ९ जुलै रोजी मर्ग नोंद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, याआधी देखील जून महिन्यात खामगाव येथील मायलेकींचा याच नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निंबा देवी संस्थानकडून भाविकांना नदीपात्रात उतरतानाही सावधगिरी बाळगण्याचे व विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.भाविकांनी दर्शनानंतर नदीत उतरतानाची जोखीम लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत असून, प्रशासनाकडून या ठिकाणी आवश्यक सूचना फलक आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.