ब्युटी पार्लरला जाते सांगून घराबाहेर पडली २९ वर्षीय महिला! पुन्हा परतली नाही; पतीच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गावातील ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचे सांगून घराबाहेर पडलेली २९ वर्षीय महिला घरी परतलीच नसल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यात घडली आहे. बराच वेळ शोध घेऊनही पत्नीचा ठावठिकाणा लागत नसल्याने पतीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पत्नीला पळवून नेले असावे, असा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.

 

प्रतापराव जाधव

ADVT 👆🏻

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शरद पाटोळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांची पत्नी सौ. सोनी संतोष पाटोळे (वय २९) या १४ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घरातील मंडळींना, “मी गावातील ब्युटी पार्लरमध्ये जाते, तुम्ही मुलांवर लक्ष ठेवा,” असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या.

मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी सुरुवातीला गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला. त्यानंतर नातेवाईकांकडेही चौकशी करण्यात आली; मात्र सोनी पाटोळे या कुठेही आढळून आल्या नाहीत.अखेर पती संतोष पाटोळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पुढील तपास पोहेकॉ भास्कर सानप करीत आहेत.