शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा डोहात बुडून मृत्यू! अंढेरा येथील घटना ...
Jul 16, 2025, 10:01 IST
अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – अंढेरा फाट्यानजीकच्या डोहात बुडून एका १६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रणव केशव इंगळे असे मृत युवकाचे नाव असून, तो नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी गेला असताना हा प्रकार घडला.
प्रणव दुपारी शौचासाठी जात असताना त्याचा पाय घसरून तो मारुती मंदिराच्या उत्तर दिशेला असलेल्या डोहात पडला. या डोहात अंदाजे २० ते २५ फूट पाणी साचलेले होते. प्रणवला पोहता न आल्याने तो पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस ठाण्याचे गजानन वाघ व नितीन पुसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी रुग्णालयात जाऊन मृत्युप्रकरणाची माहिती घेतली.
प्रणवच्या पश्चात वडील केशव इंगळे, आई, एक बहीण असा परिवार असून त्याच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.