रात्री आईसोबत घरात होती १६ वर्षीय मुलगी; पहाटे घरातून गायब! १९ वर्षीय युवकही बेपत्ता, पोलिसांत गुन्हा दाखल
तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी रविवारी रात्री सुमारे ११ वाजेपर्यंत आईसोबत घरात होती. त्यानंतर आईला झोप लागली. काही वेळाने वडील उठून मोबाइल घेण्यासाठी आले असता मुलगी घरात आढळून आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा नातेवाईकांकडे तसेच गावात शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, त्याच गावातील अर्जुन हिवाळे (वय १९) हादेखील घरात नसल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून मिळाली. त्याचा मोबाइल फोनही बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे मुलगी आणि संबंधित युवक दोघेही एकाच वेळी बेपत्ता असल्याने कुटुंबीयांचा संशय अधिक बळावला.
मुलगी घरातून जाताना गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची चप्पल घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत तिच्या आईने पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास दत्तात्रय नागरे करीत आहेत.