जिल्ह्यातून वर्षभरात ९४९ महिला बेपत्ता; ८२९ महिलांचा पोलिसांकडून शोध, ‘मिसिंग डेस्क’चा प्रभाव; बुलढाणा पोलिसांना ८७ टक्के यश...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात विविध कारणांमुळे महिला हरविण्याच्या घटना वाढत असताना त्यांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम राबवून उल्लेखनीय यश मिळवले आहे.

 वर्ष २०२५ मध्ये नोंद झालेल्या ९४९ महिला बेपत्ता प्रकरणांपैकी ८२९ महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या शोध मोहिमेत पोलिसांना सुमारे ८७ टक्के यश मिळाले आहे.

जिल्ह्यात हरविलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथे “महिला मिसिंग डेस्क” सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये “मिसिंग सेल” स्थापन करण्यात आले आहेत.
 
महिला मिसिंग डेस्क व मिसिंग सेल यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांशी सातत्याने संपर्क ठेवून हरविलेल्या महिलांचा शोध घेण्याचे काम प्रभावीपणे करण्यात येत आहे. या संयुक्त प्रयत्नांमुळे वर्ष २०२५ मधील अभिलेखावर नोंद असलेल्या प्रकरणांपैकी तब्बल ८७ टक्के महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
दरम्यान, सन २०२१ पासून आजपर्यंत २८४ महिला बेपत्ता प्रकरणे अद्याप प्रलंबित असून या महिलांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.