जीर्ण संरक्षक भिंत ठरली चिमुकलीची काळ!शाळेतून घरी परतताना ७ वर्षीय दीक्षाचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू; सुंदरखेडमध्ये शोककळा
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा वसंता चव्हाण हे पत्नी व मुलांसह नागसेननगर येथे वास्तव्यास असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर दीक्षाची आई इतरांच्या घरी धुणीभांडी करून संसाराला हातभार लावते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगत असून, दीक्षा ही गांधी प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होती.१ ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर दीक्षा घरी परतत होती. यावेळी नामदेव रुंजाजी वानखेडे यांच्या घराजवळ उभारलेली संरक्षक भिंत सततच्या पावसामुळे कमकुवत झाली होती. दीक्षा त्या मार्गाने जात असतानाच अचानक भिंत तिच्या अंगावर कोसळली. क्षणार्धात ती माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर दुखापत झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका निष्पाप चिमुकलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण सुंदरखेड परिसर शोकमग्न झाला असून, नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, सततच्या पावसामुळे जीर्ण व धोकादायक झालेल्या भिंती, इमारती आणि संरचनांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशा निष्काळजीपणामुळे पुन्हा एखादा निष्पाप जीव गमवावा लागू नये, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.