मलकापूरात ६.२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त : "मिशन परिवर्तन" अंतर्गत अंमली पदार्थावरील एलसीबीची पहिली धडक कारवाई; ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त; एका तरुणास केली अटक..!
Sep 26, 2025, 10:10 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “मिशन परिवर्तन” अंतर्गत मलकापूर शहरात अंमली पदार्थाविरुद्धची पहिली मोठी कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ सप्टेंबर रोजी केलेल्या या कारवाईत ४१,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका तरुणास अटक करण्यात आली आहे.मोहसीन ईजाज सैय्यद (वय २७), रा. पारपेठ गुरुद्वारा जबळ, मलकापूर, मूळ गाव – शाहूनगर चाळ, मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे असे आराेपीचे नाव आहे.
२५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथक मलकापूर शहरात गस्त घालत असताना मोहसीन ईजाज सैय्यद याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांची गाडी पाहताच तो पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास पकडण्यात आले. पंचासमक्ष अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे आरोग्यास घातक असे एम.डी. ड्रग्ज (मॅफेड्रॉन) ६.२५ ग्रॅम, किंमत ३१,४०० रुपये, तसेच १० हजारांचा मोबाईल मिळून आला.या सदर आरोपीविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २२(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी २६ जून २०२५ पासून "मिशन परिवर्तन" राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ही पहिली कारवाई झाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेकॉ. दीपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, मपोका. आशा मोरे, चापोना. सुरेश भिसे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोकॉ. ऋषिकेश खंडेराव यांनी ही कामगिरी पार पाडली.