टाकळी वाघजाळ येथे २९ वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कर्जबाजारीपणा व आजाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल...
Mar 11, 2026, 11:36 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथे एका २९ वर्षीय शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १० मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश प्रल्हाद हरमकार (वय २९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच बोरखेडी पोलीस स्टेशनचे बीट जमादार बळीराम खंडागळे व रायटर शेख इसाक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृत युवकाकडे गट क्रमांक १९७ मध्ये सुमारे १.३३ आर शेती असून त्या शेतीवर कर्ज असल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेची माहिती टाकळीचे पोलीस पाटील सुरेंद्र शिराळ यांनी पोलिसांना दिली.
या प्रकरणी पुढील तपास बोरखेडी पोलीस करीत आहेत.