सासरच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; JCB च्या हप्त्यांसाठी १० लाखांची मागणी, चार जणांवर गुन्हा दाखल..!
हुंड्यासाठी आणि पैशांसाठी सासरच्या लोकांकडून होणारा छळ पुन्हा एकदा समोर आला आहे. खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे सासरच्या अमानुष छळाला वैतागून एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २८ जुलै रोजी सकाळी ११:५० वाजता उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव सौ वैष्णवी अनंता वडोदे (२५) रा.शेलोडी असे आहे. याप्रकरणी वैष्णवीचे वडील दिपक वामनराव बोहरूपी (४८) रा.कंचनपुर यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. JCB चे हप्ते भरण्यासाठी २ वर्षे छळ होत होता. लग्नानंतरपासूनच वैष्णवीचा पती अनंता विठ्ठल वडोदे, सासू सविता विठ्ठल वडोदे, सासरा विठ्ठल वडोदे, दिर प्रशांत विठ्ठल वडोदे या चौघांनी संगनमत करून वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.शेतात कामाला जा आणि माहेरवरून JCB चे हप्ते भरण्यासाठी १० लाख रुपये घेऊन ये" अशी मागणी करत मागील २ वर्षांपासून चौघेही तिला शिवीगाळ आणि मारहाण करीत होते. या सततच्या छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले.या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी वैष्णवीचे पती, सासू, सासरा आणि दिर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.