मोती तलावात २३ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; जालन्याच्या साईनाथ वाघरकर यांची ओळख पटली स्थानीय नागरिकांची मदत, पोलिसांचा तपास सुरू...
May 6, 2025, 09:43 IST
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – शहरातील ऐतिहासिक मोती तलावात जालन्याच्या २३ वर्षीय साईनाथ दगडू वाघरकर यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना काल, ५ मे रोजी सकाळी उघडकीस आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळच्या वेळेत तलाव परिसरात काही नागरिकांना पाण्यात मानवी शरीर दिसले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बुद्धा चौधरी व दत्ता पारेकर यांनी धाडस दाखवत मोती तलावात उतरून मृतदेह बाहेर काढण्यास महत्त्वाची मदत केली.
या प्रकरणी बालाजी साहेबराव वाहेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग नं. ०८/२५, कलम १९४ BNS अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, साईनाथ वाघरकर हे मूळचे जालना येथील रहिवासी होते.
त्यांचा तलावात बुडून मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. जीवन खारर्डे करत आहेत.
सदर मृत्यूबाबत अधिक तपशील, बुडण्यामागचे कारण आणि इतर बाजूंना घेऊन तपास सुरू आहे. पुढील माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.