लग्नास नकार दिल्याने २० वर्षीय युवतीने घेतला गळफास ; केळवद येथील घटना...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय विजय गवई याने संबंधित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. उन्हाळ्यात लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. सातत्याने फोनवर संभाषण, भेटीगाठी आणि लग्नाची स्वप्ने दाखवून तरुणीला मानसिकदृष्ट्या गुंतवून ठेवण्यात आले होते. मात्र, २४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आरोपीने अचानक फोन करून लग्नास स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले.
या धक्क्याने पूर्णपणे खचलेल्या तरुणीने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आत्महत्या नसून, मानसिक छळातून घडवलेला गंभीर प्रकार असल्याचा आरोप मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खोट्या आश्वासनांमुळेच तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होत आहे. प्रेमाच्या नावाखाली भावनांशी खेळ करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळणार का, असा सवाल उपस्थित होत असून आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अनिल वाघ करीत आहेत.
