२० शेतकऱ्यांच्या शेतातून २०० स्प्रिंकलर तोट्या केल्या लंपास! देऊळगाव कुंडपाळ शिवारात पुन्हा धाडसी चोरी; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...
Updated: Jan 15, 2026, 15:52 IST
देऊळगाव कुंडपाळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : परिसरात अज्ञात चोरट्यांनी १३ जानेवारीच्या रात्री तब्बल २० शेतकऱ्यांच्या शेतातून २०० स्प्रिंकलर तोट्या लंपास केल्याची घटना १४ जानेवारी रोजी उघडकीस आली. सकाळी शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंप सुरू केल्यानंतर ही चोरी झाल्याचे लक्षात आले.
गेल्या पंधरा दिवसांत देऊळगाव कुंडपाळ शिवारात घडलेली ही दुसरी मोठी चोरीची घटना असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी ३१ डिसेंबरच्या रात्री येथील अर्जुन बाळकृष्ण सरकटे यांच्या टिनशेडमधून ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना घडली होती.
या घटनेत चोरट्यांनी दिनकर आश्रू सरकटे, दत्ता सरकटे, सरपंच शेषराव डोंगरे, गजानन वायाळ, केशव विठ्ठल सरकटे, विष्णू केशव जयभाये, डॉ. शिवाजी चव्हाण, सदाशिव गुरुजी सरकटे, रमेश भानापुरे, संदीप राठोड, उत्तम राठोड, वैभव सरकटे, भुजंगराव सरकटे, विष्णू सरकटे, चाटे गुरुजी, संदीप शिवलाल राठोड यांच्यासह एकूण २० शेतकऱ्यांच्या शेतांमधील स्प्रिंकलर तोट्या चोरल्या आहेत.
वारंवार होत असलेल्या शेती साहित्याच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, परिसरात सक्रिय असलेल्या चोरीच्या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
