

20 वर्षीय तरुणी, 30 वर्षीय विवाहिता खामगावातून बेपत्ता…
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलाच्या खेळण्यावरून झालेल्या वादानंतर पत्नी मुलासह दुकानात जाते म्हणून घरातून गेली. ती परतलीच नाही. पतीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. सौ. पूनम राजेश भीमराव मळकराम (30) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांचे पती राजेश यांनी ३ मार्चला पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली, की पत्नीसोबत मुलाच्या खेळण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर २ मार्चच्या सायंकाळी सहाच्या सुमारास ती मुलाला दुकानात घेऊन जाते असे सांगून मुलासह घराबाहेर पडली. त्यानंतर ती परतलीच नाही. तिचा नातेवाइक तसेच अन्यत्र शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. दरम्यान पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली असून, तपास नापोकाँ श्री. मोठे करत आहेत.
20 वर्षीय तरुणी घरातून निघून गेली…
20 वर्षीय तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली. ती अद्याप परतली नाही. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिच्या आईने हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. दिपाली सुनील मानकर असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई सौ. अर्चना यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की ३ मार्चच्या दुपारी ४ च्या सुमारास ती घरातून निघून गेली. तिचा नातेवाइक आणि मैत्रिणींकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. काल रात्री उशिरा पोलिसांनी या प्रकरणी हरवल्याची नोंद घेऊन तिचा शोध सुरू केला आहे. तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.