जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; शेगाव येथील घटना...

 
शेगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जुन्या वादातून एका १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची  घटना शहरातील डगडाळीपुरा परिसरात घडली असून या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनायक गजानन गोरे वय (४८, रा.धनगर नगर, शेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांचा मुलगा विक्रम विनायक गोरे वय १९ हा २८ मार्च रोजी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर मित्रासोबत बाहेर गेला होता. रात्री सुमारे १० वाजता त्याला शेगाव येथे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर  रुग्णालयात गेले. त्यावेळी विक्रमने सांगितले की, डगडाळी पुरा येथील गुरुकृपा गेस्ट हाऊससमोरील सद्दाम यांच्या हॉटेलवर चहा पिण्यास गेलो असताना आरोपी श्याम पाटील रा.मोदी नगर, शेगाव याने जुन्या वादातून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच हातातील धारदार वस्तूने मानेवर वार करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. जखमीवर स.मो.सा. रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जीएमसी रुग्णालय, अकोला येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.