देऊळगाव राजातून १६ वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा...

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील त्र्यंबकनगर परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी घराबाहेर पडलेली ही मुलगी सायंकाळपर्यंत परतलीच नाही. कुटुंबीय व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी त्र्यंबकनगर परिसरातील नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. ९ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजता ती घरातून बाहेर पडली. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच संभाव्य ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, काहीही माहिती मिळाली नाही.

दरम्यान, तक्रारदाराने अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून कायदेशीर पालकांच्या ताब्यातून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर नेमकी कुठे गेली? ती कोणाच्या संपर्कात होती? तसेच तिच्या बेपत्ता होण्यामागे नेमके काय कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.