‘एलसीबी’चा कारवायांचा धडाका… सकाळी मोताळ्यात रेतीमाफियांविरोधात 21 लाखांची कारवाई; दुपारी जळगाव जामोद तालुक्यात अवैध देशी दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या; कालही नांदुऱ्यात रेतीतस्करांना दिला होता दणका!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवायांचा धडाका लावला आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. आज, 30 जूनला एलसीबीने दोन मोठ्या कारवाया केल्या. सकाळी मोताळा तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना पकडले तर दुपारी जळगाव जामोद गाठून देशी दारूची अवैध वाहतुक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. आज सकाळी मोताळा तालुक्यातील टाकरखेड …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवायांचा धडाका लावला आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. आज, 30 जूनला एलसीबीने दोन मोठ्या कारवाया केल्या. सकाळी मोताळा तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना पकडले तर दुपारी जळगाव जामोद गाठून देशी दारूची अवैध वाहतुक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.

आज सकाळी मोताळा तालुक्यातील टाकरखेड येथील विश्वगंगा नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. एलसीबी पथकाने मिळालेल्या माहितीवरून छापा मारला असता अवैध रेती उत्खनन होत असल्याचे दिसले. यावेळी पथकाने शिताफीने ज्ञानेश्वर देविदास सुरळकर(26), संदीप दिनकर पडोळकर (25, दोघेही रा. टाकरखेड ता. मोताळा) यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दीड ब्रास रेती (किंमत 7 हजार 700 व 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह किंमत 21 लाख) असा एकूण 21 लाख 7 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आटोपून पथक जळगाव जामोदच्या दिशेने रवाना झाले. पळशी फाटा (ता. जळगाव जामोद) येथे एलसीबीने सापळा रचला. त्यावेळी एका कारमधून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. एलसीबीने वाहनाची तपासणी केली असता चार पेट्या देशी दारू आढळली. यावेळी वाहनातील सागर वासुदेव कोकाटे (26, रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद), अतुल अरुण मानकर (30, रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद), विवेक प्रल्हाद श्रीनाथ (21, रा. शिवशंकरनगर नांदुरा), श्याम कैलास घटे (25, रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद) यांना ताब्यात घेऊन जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून नगदी 6 हजार 400 रुपये, एक चारचाकी वाहन व एक दुचाकी असा एकूण 6 लाख 95 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाया कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पोउपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ श्रीकृष्ण चांदूरकर, पोकाँ गजानन गोरले, पोकाँ विजय सोनोने, पोकाँ सतिश गुंजकर यांनी पार पाडली.

रेतीची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर नांदुऱ्याजवळ पकडले; एलसीबीची कारवाई
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
चोरटी रेती वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने पकडून जप्‍त केले. ही कारवाई काल, 29 जूनला सकाळी साडेआठच्‍या सुमारास नांदुरा- मलकापूर रोडवरील वडनेर बसस्थानकाजवळ करण्यात आली.
या प्रकरणी एलसीबीचे पोहेकाँ श्रीकृष्ण लक्ष्मण चांदुरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नीलेश श्याम इंगळे (33, रा. बेलाड, ता. मलकापूर) व संजय भिकाजी बावस्कर (रा. लक्ष्मीनगर मलकापूर) या दोघांना ताब्‍यात घेऊन गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांकडून एक मोबाइल (किंमत 1000 रुपये), ट्रॅक्‍टर (क्र. एमएच 28 डी 5853, किंमत 5 लाख रुपये), ट्रॉली(क्र. एमएच 28 डी 5853, किंमत 1 लाख रुपये), ट्रॉलतील एक ब्रास वाळू (किंमत 5000 रुपये) असा 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. घटनेबाबत सूत्रांनी सांगितले, की एलसीबीचे पोलीस उपनिरिक्षक नीलेश शिवाजी शेळके हे अंमलदार रघुनाथ उत्तम जाधव, गजानन पुंडलिक गोरले, संजय मिसाळ यांच्‍यासह पेट्रोलिंगसाठी मलकापूर उपविभागात होते. वडनेर भोलजी बसस्थानकावर ते आले असता त्‍यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक व्‍यक्‍ती ट्रॅक्टरव्दारे अवैधरित्या विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करत आहे. तो रेती घेऊन सिरसोली शिवारातून वडनेर भोलजीच्या दिशेने निघाला आहे. पथकाने तातडीने वडनेर बसस्थानकाजवळ सापळा रचला. काही वेळातच एक व्‍यक्‍ती शिरसोलीकडून मलकापूर रोडने रेतीने भरलेला ट्रॅक्‍टर घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्‍याला थांबवले. चालकाला रेती कुठून आणली असे विचारले असता त्‍याने सिरसोली शिवारातून विश्वगंगा नदीपात्रातून रेती आणल्‍याचे सांगितले. त्‍याच्‍याकडूर रेती वाहतुकीचा परवाना नव्‍हता. रेती चोरीची असल्याचे समोर आल्याने चालक नीलेशला साथीदारासह ताब्‍यात घेण्यात आले. तपास वडनेर भोलजी चौकीचे पोहेकाँ निबोळकर करत आहेत.