वडील, भावानेच खून करून विवाहित तरुणीला झाडाला लटकवले!; किनगाव जट्टूतील थरार

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू शिवारात झाडाला खून करून लटकविण्यात आलेल्या विवाहितेच्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. तिच्या अनैतिक संबंधामुळे आपली बदनामी होत असल्याने वडील व भावाने तिला संपवले. नंतर तिचा मृतदेह झाडाला लटकवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बिबी पोलिसांनी तिच्या वडील-भावाला अटक केली असून, दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लोणार तालुक्‍यातील किनगाव जट्टू शिवारात झाडाला खून करून लटकविण्यात आलेल्या विवाहितेच्‍या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. तिच्‍या अनैतिक संबंधामुळे आपली बदनामी होत असल्याने वडील व भावाने तिला संपवले. नंतर तिचा मृतदेह झाडाला लटकवल्‍याचे समोर आले आहे. या प्रकरणी बिबी पोलिसांनी तिच्‍या वडील-भावाला अटक केली असून, दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

किनगाव जट्टूजवळील दुसरबीड रोडवरील वसंतनगर शिवारात निंबाच्‍या झाडाला 26 वर्षीय विवाहितेचा मृतदेह लटकलेला आढळला होता. रोही वन्यप्राण्यांना हुसकावण्यासाठी गेलेल्या युवकांना मृतदेह दिसल्यानंतर त्‍यांनी वसंतनगरचे पोलीस पाटील अरुण रुपसिंग राठोड यांना घटनेची माहिती दिली. त्‍यांनी बिबी पोलिसांना कळवले. ठाणेदार लहू तावरे, पीएसआय श्री. व्‍यवहारे यांच्‍यासह पथकाने घटनास्‍थळी येत पंचनामा केला. खून झालेली विवाहिता किनगाव जट्टू नजिकच्‍या आईचा तांडा येथील नीता वामन आडे असल्याचेही समोर आले. पोलिसांना तिच्‍या चेहऱ्यावर मारहाण केल्याच्‍या खुना आढळल्‍याने हा खून असल्याचेही निष्पन्‍न झाले. पोलिसांनी तत्‍काळ ठसे तज्‍ज्ञ, श्वानपथकाला पाचारण केले. या प्रकरणी खुनाचा गुन्‍हा दाखल करून तपासाला सुरुवात झाली. दोन पथके तपासासाठी तयार करण्यात आली. तपासात निताचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. गुप्‍त माहितीवरून पोलिसांनी तिचे वडील वामन खिरा आडे (45), भाऊ राहुल वामन आडे (23) या दोघांना ताब्‍यात घेतले. चौकशीत त्‍यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र खाक्‍या दाखवताच दोघांनी खुनाची कबुली दिली.

प्रियकरासोबत मेहकरला राहत होती..

निताचे सासरच्या मंडळीशी मतभेद असल्याने ती विवाहानंतर काही महिन्‍यांपासून 3 वर्षीय मुलासह वडिलांकडे राहायला आली होती. याच दरम्‍यान गावातील एका युवकासोबत अनेक दिवसांपासून तिचे अनैतिक संबंध प्रस्‍थापित झाले. वडील व भावाने बदनामी होत असल्याने तिला समजावले. पण तिने त्‍यांचे न ऐकता त्‍या युवकासोबत संबंध कायम ठेवत दोघेही मेहकरला राहायला गेले. समाजात बदनामी होत असल्याने वडील व भावाने तिचा काटा काढायचे ठरवले.

आठवण येतेय म्‍हणून बोलावले अन्‌…

तुझ्या मुलाची आठवण येत असून, त्‍याला भेटण्यासाठी घेऊन ये, अशी विनंती करून निताला तिच्‍या वडिलाला घरी बोलावले. त्‍यामुळे निता मेहकरवरून गावी आली. रात्रीच्‍या वेळी निताला वडील व भावाने मारहाण केली व दोरीच्‍या साह्याने तिचा गळा आवळला. ती गतप्राण झाल्याचे लक्षात येताच रात्रीच तिचा मृतदेह झाडाला लटकवला.  दोन्‍ही आरोपींना अटक करून न्‍यायालयात हजर केले असता 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आणखी आरोपी अटक होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली.