लग्न ठरले, साखरपुडा झाला! अल्पवयीन असल्याने प्रशासनाने रोखला बालविवाह; पण, भावी नवऱ्याशी बोलता बोलताच गायब झाली मुलगी... बुलढाणा तालुक्यातील धक्कादायक प्रकार...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – तालुक्यातील एका गावात नागरिकांच्या सतर्कतेमुळे थांबविण्यात आलेला बालविवाह काही दिवसांनी पुन्हा चर्चेत आला आहे. कारण, बालविवाह थांबवलेल्या अल्पवयीन मुलीने ६ जून रोजी रात्री ११.३० वाजता घरातून पलायन केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या पालकांनी तिचे लग्न एका मुलासोबत ठरवले होते. साखरपुडा देखील पार पडला होता आणि ५ मे रोजी विवाह होणार होता. मात्र गावातील जागरूक नागरिकांनी १०९८ या बालहक्क हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार केल्यामुळे विवाह थांबवण्यात आला. त्यानंतर पालकांनी ठरवले की, मुलगी १८ वर्षांची झाल्यावरच लग्न करतील.
मात्र ६ जून रोजी रात्री घरातील सर्वजण झोपेत असताना संबंधित मुलगी होणाऱ्या पतीसोबत संवाद साधत होती. काही वेळातच ती अज्ञात युवकासोबत घरातून निघून गेली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात युवकाविरुद्ध अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेने गावात खळबळ उडाली असून, पोलिस तपास सुरु आहे. बालविवाह रोखल्यानंतरही अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम असल्याचे या घटनेतून दिसून येते.