लई भारी कामगिरी… रेड बसचा कर्मचारी सांगून प्रवाशाचे सहा लाख उडवले; बुलडाणा सायबर पोलिसांनी सोडला नाही पिच्‍छा, अखेर गुजरातेतून पकडून आणला भामटा!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेड बसचा कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशाच्या बँक खात्यातून 6 लाख 6 हजार 894 रुपयांची रक्कम उडवणाऱ्या भामट्याला बुलडाणा सायबर पोलिसांनी गुजरात राज्यातून पकडून आणले. लुकमान अन्सारी इम्तियाज आलम (रा. पहरुडीह ता. पालजोरी जि. देवघर झारखंड) असे आरोपीचे नाव असून, शापर व्हिलेज ता. जि. मोरबी (गुजरात) येथून त्याच्या …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेड बसचा कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशाच्‍या बँक खात्‍यातून 6 लाख 6 हजार 894 रुपयांची रक्कम उडवणाऱ्या भामट्याला बुलडाणा सायबर पोलिसांनी गुजरात राज्यातून पकडून आणले. लुकमान अन्सारी इम्तियाज आलम (रा. पहरुडीह ता. पालजोरी जि. देवघर झारखंड) असे आरोपीचे नाव असून, शापर व्हिलेज ता. जि. मोरबी (गुजरात) येथून त्‍याच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. आरोपी पकडला जाणे तसे कठीण होते, पण हुशारी आणि तंत्रज्ञानाच्‍या मदतीने अशक्‍यप्राय गोष्ट बुलडाणा सायबर पोलिसांनी शक्‍य करून दाखवली.

आडविहीर (ता. मोताळा) येथील रहिवासी पंकज श्रीकृष्ण फिरके हे एस्कॉर्ट लिमिटेड कंपनीच्या धुळे येथील शोरुममध्ये एक्‍झिक्‍युटिव्‍ह आहेत. त्यांचे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मोताळा येथील बँकेत बचत खाते असून, त्यांनी 5 लाख रुपयांची रक्कम मागील 10 वर्षांपासून बँकेत फिक्स डिपॉझिट केले होते. त्यांच्या रक्कमेचे व्याजासह 6,41,561 रुपये झाले होते. त्यांना धुळे येथून कंपनीच्या कामासाठी पुणे येथे जाणे आवश्यक असल्याने त्यांनी रेड बसवरून प्रथमेश ट्रॅव्हल्सचे 5 डिसेंबर 2020 चे ऑनलाइन तिकिट काढले. मात्र त्यांचे तिकिट कन्फर्म न झाल्याने त्यांनी रेड बसचा हेल्‍पलाइन नंबर गुगलवरून शोधला व कॉल केला. त्यावरून फिरके यांना परत फोन आला. समोरच्या व्‍यक्‍तीने सांगितले की तुमचे रेड बसचे तिकिट रद्द करायचे असल्यास तुमच्या तिकिटचे डिटेल्स पाठवा. त्‍यामुळे फिरके यांनी माहिती दिली. मात्र तरीही त्यांचे पैसे परत न आल्याने त्‍यांनी विचारणा केली असता त्यांना एनीडेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे पंकज फिरके यांनी ॲप डाऊनलोड केले असता 5 डिसेंबर 2020 रोजी 20 मिनिटांच्‍या कालावधीत त्यांच्‍या बँक खात्‍यातून 6,41,561 रुपयांची रक्कम त्यांच्‍या बचत खात्यात जमा झाली. त्यानंतर बचत खात्यातील 6,06,894 रुपये सात ट्रान्‍झेक्‍शन होऊन ही रक्‍कम भामट्याने ऑनलाइन ट्रान्सफर केली. फिरके यांनी त्यांच्‍या लॅपटाॅपवरून अचानक ट्रान्सफर झालेल्या रकमेचे विवरण चेक केले असता त्यांना त्यांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बुलडाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सायबर विभागाने त्यांच्‍या तक्रारीची दखल घेऊन 86,999 रुपये तात्काळ फिर्यादीच्‍या खात्यात रिफंड केली. त्यानंतर पंकज फिरके यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात 7 डिसेंबर 2020 रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्‍याशी ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या मोबाइलवरील व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्‍यानंतर सायबर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून तक्रारदारांच्‍या खात्याचे अकाउंट स्टेटमेंट चेक करून त्‍या मोबाइल धारकाचा शोध सुरू केला.

असा लावला शोध…
भामट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फिरके यांची 6,06,894 रुपयांची रक्कम ज्‍या बँक खात्‍यात पाठविण्यात आली. त्या सर्वांच्‍या ठावठिकाणांचा शोध घेतला. तेव्हा संशयित हे झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यातील असल्याचे तपासात आढळले. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍या आदेशाने सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलासकुमार सानप, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, पवन मखमले, कैलास ठोंबरे, अमोल तरमळे यांचे पोलीस पथक त्‍या त्‍या ठिकाणी पाठविण्यात आले. परंतु आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने ते त्यांच्‍या घरातून फरार झाले होते. त्यांचे मोबाइलही त्‍यांनी बंद करून टाकले होते. मात्र तपास अधिकारी प्रदीप ठाकूर यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकास परत बोलावून पुन्हा तांत्रिक तपास केला. तेव्हा आरोपी लुकमान अन्सारी इम्तीयाज आलम (रा.पहरुडीह ता.पालाजोरी जिल्हा देवघर (झारखंड) हा सध्या डिलीसो सिरॅमीक, जेटपर रोड, शापर व्हिलेज ता. जि.मोरबी (गुजरात) राज्यात असल्याची उपयुक्त माहिती मिळून आली.

या माहितीच्या आधारे पुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक विलासकुमार सानप, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, पवन मखमले, कैलास ठोंबरे, अमोल तरमळे यांचे पोलीस पथक गुजरात येथे पाठवून तांत्रिक माहितीच्‍या आधारे स्थानिक पोलिसांच्‍या मदतीने गुन्ह्यात वापरलेल्या मोबाइल हँडसेटसह आरोपीस अटक केली. आरोपीला बोराखेडी पोलीस स्टेशन येथे आणून हजर केले. आज, 22 जुलै रोजी आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आरोपींचे आणखी साथीदार पोलीस तपास निष्पन्न होण्याची आहे. या गुन्ह्याचा तपास कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बुलडाणा बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्‍या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विलासकुमार सानप, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, पवन मखमले, कैलास ठोंबरे, अमोल तरमळे यांनी केला.