रक्‍ताच्‍या थारोळ्यात सापडलेल्या मृतदेहाचे अन्‌ पिस्‍तुलाचे गौडबंगाल काय?

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 6 जवळ काल, 6 मे रोजी दुपारी तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला होता. उजव्या कानशिलाजवळ पिस्तुलाची गोळी झाडल्याचे दिसत होते… जवळच गावठी बनावटीचे पिस्तूल पडलेले… असे एकूण घटनास्थळाचे चित्रण होते… मृतदेह अन् पिस्तुलाचे गौडबंगाल नक्की ते काय, असा प्रश्न होता. पिस्तुलाचे गौडबंगाल उकलले पण मृतदेहाचे गौडबंगाल …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नगरपरिषदेच्‍या शाळा क्रमांक 6 जवळ काल, 6 मे रोजी दुपारी तरुणाचा रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला होता. उजव्या कानशिलाजवळ पिस्‍तुलाची गोळी झाडल्‍याचे दिसत होते… जवळच गावठी बनावटीचे पिस्‍तूल पडलेले… असे एकूण घटनास्‍थळाचे चित्रण होते… मृतदेह अन्‌ पिस्‍तुलाचे गौडबंगाल नक्‍की ते काय, असा प्रश्न होता. पिस्‍तुलाचे गौडबंगाल उकलले पण मृतदेहाचे गौडबंगाल आजही कायम होते. नक्‍की आत्‍महत्‍याच की हा घातपात आहे, असा संशय येण्याला कारणेही अनेक आहेत.

सहायक पोलीस निरिक्षक युवराज धनराज रबडे यांना काल 6 मे रोजी दुपारी पोलीस कॉन्‍स्‍टेबल गणेश लोढे यांनी मृतदेहाची माहिती दिली. तातडीने श्री. रबडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळ गाठले. तेथे एक युवक शाळेतील पायऱ्यांवर मृतावस्थेत पडलेला दिसला. बाजूलाच मोहित मधुकरराव मोकळे उर्फ चिक्कू (35, रा. शिक्षक कॉलनी, मेहकर), भुवन मंगलसिंग ठाकूर उर्फ बंटी, नीलेश आत्माराम कंकाळ (36) हे तिघे उभे होते. मृतकाचे नाव अर्पण दिनेश मोकळे उर्फ सोनू (25) असल्याचे तिघांनी सांगितले. खासगी वाहनाद्वारे नीलेश कंकाळसोबत मृतदेह मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

पिस्‍तुल आले कुठून?

घटनास्थळी मिळून आलेले गावठी बनावटीचे पिस्‍तुल आपले असल्याचे मोहितने सांगितले. त्‍याने मेहकरमधील लखनसिंग सरदारसिंग बावरी याच्‍याकडून अवैधरित्या ते घेतल्याची कबुली दिली.

दागिने बँकेत ठेवून अर्पणने घेतले होते कर्ज…

अर्पणचे आई- वडील वारलेले आहेत. त्याचा सख्खा भाऊ, अर्पणची सावत्र आई आणि मोहित असे सारे एकत्र राहतात. घरातील सर्व व्यवहार अर्पणच पाहत होता. सोबतच तो अॅमेझॉन झी सेलचे दुकान चालवतो. त्‍याने घरातील सर्व महिलांचे दागिने बुलडाणा अर्बन पतसंस्थेत गहाण ठेवून कर्ज घेतलेले आहे. नातेवाइकांचे लग्न असल्याने दागिने सोडवून आणण्याबाबत काका मोहितने सांगितले होते. त्याने आणतो म्हणून सांगितले होते. मात्र नंतर तो फोन रिसिव्ह करत नव्हता. त्‍यामुळे मोहित आणि नीलेश कंकाळ त्याचा शोध घेत असताना अर्पण नगरपरिषद शाळेत असल्याचे बंटी ठाकूरकडून मोहितला कळाले. दोघे तेथे गेले असता अर्पण रक्तबंबाळ व मरण पावलेल्या अवस्थेत दिसला.

बंटी म्‍हणाला…

बंटी ठाकूरने पोलिसांना सांगितले, की अर्पण माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. एक वर्षापासून त्याच्‍या प्‍लॉटवर राहत होतो. मागील 5-6 दिवसांपासून तो चिंतित होता. त्याने बँकेतील सोन्यावर 5-0 लोन केस केल्या होत्या. पैकी एक लोन केस केल्याबाबतच त्याने काका मोहितला सांगितले होते. बँकेत 5 लाख रुपये भरल्‍याशिवाय सोनेही परत मिळणार नव्‍हते. त्‍यामुळे तो चिंतित होता. काल सकाळी 9.30 च्‍या सुमारास मी व अर्पण मोटारसायकलने हरण टेकडी येथे गेलो. जाताना त्‍याने माझ्या काकाची पिस्‍तूल कृष्णाला दिलेली असून तो व इतर मित्र आपल्या दोघांची हरण टेकडीवर वाट बघत असल्याचे सांगितले. त्‍या ठिकाणी मित्र कृष्णा विजय लहाने, गोविंद सतिष हेडा, मंगेश गजानन देशमुख (सर्व रा.मेहकर)  बसलेले होते. कृष्णाजवळची पिस्‍तूल गोविंदकडे होती. गोविंदने पिस्‍तूलमधून हवेत फायर केला. त्यानंतर सर्वांनी पिस्‍तूल हाताळली. नंतर गोविंदने पिस्‍तूल अर्पणकडे दिले. अर्पणने ते माझ्याकडे दिले. अर्पण बँकेत गेल्यानंतर मी ते पिस्‍तूल घरी नेऊन ठेवले. काही वेळाने अर्पणचा मला फोन आला व त्याने पिस्‍तूल मागून घेतली. त्‍याला मी ती देऊन टाकली. नंतर आम्‍ही दोघे घरून तोरणा अमृततुल्य हॉटेलजवळ आलो. तेथे त्याने मला सोडून परत येतो, असे सांगून शिवाजीनगरकडे निघून गेला. बराच वेळ वाट पाहूनही तो न आल्याने त्याचा शोध घेतला असता त्याची गाडी शाळेच्या परिसरात दिसली. शाळेत जाऊन पाहिले असता शाळेतील आतील पायऱ्यांवर अर्पण रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडलेला दिसला. जवळच पिस्‍तूल पडलेली होती. तेवढ्यात अर्पणच्या मोबाइलवर फोन आल्याने तो उचलला असता नीलेश कंकाळ बोलत होता. त्याला मी अर्पण बद्दल सांगून रुग्‍णवाहिका आणण्यास सांगितले…

पोलिसांनी असे केले गुन्‍हे दाखल

अर्पणच्‍या मृत्‍यूप्रकरणी तूर्त आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद पोलिसांनी केली असली तरी मोहित मोकळे याने लखनसिंग बावरी याच्‍याकडून अवैधरित्‍या गावठी पिस्‍तूल विकत घेऊन जवळ बाळगले. हे  पिस्‍तूल अर्पण, कृष्णा लहाने, भुवन ठाकूर, गोविंद हेडा, मंगेश गजानन देशमुख यांनीही हाताळले. त्‍यामुळे पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्‍हे दाखल केले आहेत. चौकशीत मोहित आणि बंटी यांनी दिलेले जबाब अनेक प्रश्न निर्माण करतात. त्‍यामुळे घातपात की आत्‍महत्‍या यावर सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण होत आहे.