महाविद्यालयीन मुला-मुलींच्‍या ग्रुपवर ओढावले संकट!; चार चोरट्यांनी मारहाण करत लुटले, झटापटीत मैत्रिण २० फूट खोल दरीत!! पोलिसांनी अवघ्या काही तासांत पकडले चोरटे!; गिरडा घाटात तुम्‍हीही जात असाल तर ही घटना दूर्लक्षित करू नका…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिकनिकसाठी गेलेल्या सहा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चोरट्यांनी मारहाण करत लुटले. ही घटना काल, १४ जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास बुलडाणा तालुक्यातील गिरडा घाटात घडली. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत या चोरांना गजाआड केले. अजिंठा रोडवरील आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेदिक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पिकनिकसाठी गेलेल्या सहा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चोरट्यांनी मारहाण करत लुटले. ही घटना काल, १४ जुलैला दुपारी साडेतीनच्‍या सुमारास बुलडाणा तालुक्‍यातील गिरडा घाटात घडली. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत या चोरांना गजाआड केले.

अजिंठा रोडवरील आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी भूषण रमेश राठोड (२३) या प्रकरणात बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार तो, त्याचा मित्र शिवम गोपाल चौधरी,अभिषेक सांबापुरे, सचिन चव्हाण आणि दोन मैत्रिणी असे सहा जण काल गिरडा येथे पिकनिकसाठी गेले होते. गिरडा घाटावर फोटो काढत असताना त्यांच्याजवळ चार अनोळखी व्यक्‍ती आले. ही जागा आमची आहे. तुम्ही इथे कशाला थांबले, असे म्हणत एकाने भूषण आणि त्याच्या मित्र- मैत्रिणींचा फोटो काढला. हा फोटो आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करू, अशा धमक्या दिल्या. तेथील झाडांच्या फांद्या तोडून भूषण आणि शिवम चौधरी यांना मारहाण केली. त्यांचे मोबाइल फोनही हिसकावून घेतले. भूषण आणि शिवमने त्‍यांना विरोध केला असता दोन मैत्रिणींचे फोन जबरीने हिसकावून घेण्यात आले. या झटापटीतएक मैत्रिण तोल जाऊन १५ ते २० फूट खोल दरीत कोसळली. तिला दरीतून काढेपर्यंत चारही चोरटे फरारी झाले होते. त्‍यांनी सहा मोबाइल आणि रोख १४०० रुपये असा एकूण ४६ हजार २५० रुपयांचा लुटून मुद्देमाल नेला होता. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी तेथील मंदिरासमोरील चहाच्या टपरीवरील हकीकत सांगितली. मारहाण करणाऱ्यांचे वर्णन कथन केले. तेथील लोकांनी काही फोटो विद्यार्थ्यांना दाखवले असता यांनीच मारहाण केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी तेथील लोकांकडून मारहाण करणाऱ्यांचे फोटो घेऊन बुलडाणा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

काही तासांतच पाच जण जेरबंद
बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली. ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या महिन्याभरापूर्वी मुंबईवरून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेले सहायक पोलीस निरिक्षक सदानंद सोनकांबळे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. आज सकाळी ९ वाजेपूर्वी चारही चोरट्यांना मढ (ता. बुलडाणा) येथून तर एकाला शिवनगर पहुरपेठ जामनेर (जि. जळगाव) येथून ताब्यात घेतले. मजीत जुम्मा तडवी (२८, रा. जांभूळ, ता. जामनेर जि. जळगाव), समीर जलाल बागुल (२०), आमिर शेख खाबरडे (२२), सुलतान दिलवार बरडे (२७, तिघेही रा. मढ), अफसर अकबर तडवी (२७, रा. शिवनगर पहूरपेठ, जामनेर, जि. जळगाव) अशी पकडण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.