बुलढाण्यात चेन स्नेचिंग; महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची पोत क्षणार्धात ओढून नेली; शिवशंकर नगरातील घटना; दोन चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल !

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील शिवशंकरनगर परिसरात ६८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात दोन चोरट्यांनी लंपास केली. ही  घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. दुचाकीवर आलेल्या चोरटे अडीच तोळ्यांची, तब्बल ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत क्षणात ओढून पसार झाले.या प्रकरणी दोन चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
उषा रमेश भिसे (वय ६८) या २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ८.४० वाजता त्यांच्या परिचित संगीता सूर्यवंशी यांच्याशी घरासमोर बोलत उभ्या होत्या. त्याचवेळी दोन तरुण दुचाकीवर संशयास्पदरीत्या काही अंतरावर थांबलेले दिसले. काही क्षणांतच त्यांनी दुचाकी थेट महिलांच्या दिशेने नेली आणि समोर बसलेल्या तरुणाने भिसे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने ओढून घेत पलायन केले.

भिसे यांनी आरडाओरड करताच परिसरातील अजय सूर्यवंशी यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र दुचाकीचा वेग जास्त असल्याने पाठलाग अपयशी ठरला. घटनेनंतर काही क्षणातच मोठी गर्दी जमा झाली. सुमारे २५ वर्षे वयोगटातील दोन तरुणांनी ही चोरी केल्याची माहिती तिथे उपस्थित असलेल्यांनी दिली. या प्रकरणी उषा भिसे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यापूर्वीही बीडसह मराठवाड्यातील काही चेनस्नॅचिंग चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी पुन्हा बुलढाण्यात चोरटे सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.