चोरटे शेतकऱ्यांच्या जीवावर उठले! पैनगंगेच्या काठावरील १४ मोटार पंप फोडले; तांब्याच्या तारा चोरल्या.. मेहकर तालुक्यातील भालेगाव शिवारातील प्रकार! खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर मोठे संकट

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरीप हंगाम तोंडावर आला आहे.. काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी जवळच्या पाण्यावर कपाशीची लागवड सुरू केली आहे..मात्र चोरटे शेतकऱ्यांच्या जीवावर उठले की काय? असा सवाल उपस्थित होतोय.. चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही, त्यामुळेच चोरट्यांची हिम्मत वाढली आहे. मेकर तालुक्यातील नांद्रा परिसरातील भालेगाव शिवारात असलेल्या पैनगंगा नदीच्या काठावरील शेतांमध्ये सिंचनासाठी बसविण्यात आलेले तब्बल १४ मोटारपंप चोरट्यांनी फोडले आहेत. त्यातील तांब्याच्या तारा व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

   प्राप्त माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी नदीकाठावरील शेतांमध्ये प्रवेश करून सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटार पंपाचे नुकसान केले. पंप फोडून त्यामधील तांब्याच्या तारा आणि मौल्यवान साहित्य चोरी करून लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकरी शेतात गेले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

खरीप हंगामाच्या तोंडावर घडत असलेले या घटनांमुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. सिंचनासाठी अत्यावश्यक असलेले उपकरणे निकामी झाल्याने पेरणी आधीच्या तयारीवर देखील परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच वाढत असलेला उत्पादन खर्च, बदलते हवामान.. आर्थिक अडचणींचा सामना अशातच पेरणीच्या आधीच अशा पद्धतीचे संकट ओढवल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. या प्रकरणातील आरोपींच्या तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून समोर येत आहे.