इंजिनिअरला ऑनलाइन गंडा..!; चिखलीतील प्रकार, 485 रुपये परत घेण्याच्‍या नादात गमावले 80 हजार!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एका अभियंत्याला ऑनलाइन गंडा घालून 80 हजार रुपये त्याच्या बँक खात्यातून गायब केले. ॲमेझॉनवर केलेली ऑर्डर न आल्याने 485 रुपये परत घेण्यासाठी केलेले ‘गुगल सर्च’ या अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे. नारायण गणेश डुकरे (25, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली) चिखलीतील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी करतात. त्यांनी चिखलीतील एसबीआय शाखेत …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एका अभियंत्‍याला ऑनलाइन गंडा घालून 80 हजार रुपये त्‍याच्‍या बँक खात्‍यातून गायब केले. ॲमेझॉनवर केलेली ऑर्डर न आल्याने 485 रुपये परत घेण्यासाठी केलेले ‘गुगल सर्च’ या अभियंत्‍याला चांगलेच महागात पडले आहे.

नारायण गणेश डुकरे (25, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली) चिखलीतील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी करतात. त्‍यांनी चिखलीतील एसबीआय शाखेत सॅलरी अकाऊंट उघडले आहे.  त्‍यांनी 24 मार्चला ॲमेझॉनवर टॅब्‍लेट गोळ्यांची 485 रुपयांची ऑर्डर दिली होती. एटीएम कार्डने पेमेंट केले होते. 31 मार्चपर्यंत ऑर्डर घरपोच मिळणार होती. मात्र या तारखेनंतरही पार्सल न मिळाल्याने त्‍यांनी गूगलवर सर्च करून ॲमेझॉन कंपनीचा 08252876204 नंबर मिळवला. तिकडून बोलणाऱ्याने 9832798994 या नंबरवरून एक लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक करून माहिती भरण्यास सांगितले. माहिती भरल्‍यानंतर फोनवर बोलणे चालू असताना त्यांनी तुमचे दुसरे खाते असल्यास तो नंबर टाका, असे सांगितले. नंतर पुन्‍हा या खात्यात रक्कम शून्य असल्यामुळे पैसे टाकता येत नाही. एखाद्या मित्राचा बँक खाते नंबर द्या, असे सांगितल्याने संशय आल्यामुळे डुकरे यांनी फोन पेवर बँक खात्‍यातील बॅलेन्स चेक केले असता खात्यात केवळ 5050 रुपये दिसून आले. याबाबत समोरून बोलणाऱ्याला विचारणा केली असता त्‍याने कॉल होल्डवर ठेवला. त्‍यानंतर उरलेले 5050 रुपये देखील काढून घेतले. अख्खे खाते भामट्याने शून्य बॅलन्स केले. त्‍यामुळे डुकरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

बुलडाणा लाइव्‍हचे आवाहन…

ऑनलाइन फ्रॉडबद्दल बुलडाणा लाइव्‍हकडून वारंवार आवाहन केले जाते. आपल्या बँक खात्‍याची, एटीएमची माहिती कुणालाही देऊ नये. अगदी बँकेतून कुणी बोलतोय असे म्‍हटले तरी ही माहिती देऊ नये. गुगल पे, फोन पेला अडचण आली तरी गुगलवर सर्च करून नंबर मिळवू नये. अनेक भामटे तुम्‍हाला गळाला लावायला टपलेले असतात. त्‍यांच्‍या बोलण्यात अडकले की तुम्‍ही कंगाल झालेच म्‍हणून समजा.