अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने अभियंत्‍यावर जीवघेणा हल्ला!; कारमधून खेचत बेदम मारहाण; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध मुरुम उत्खननाची तक्रार केल्याने स्थापत्य अभियंता असलेल्या 34 वर्षीय युवकाच्या कारवर सहा जणांनी हल्ला चढवला. कारमधून बाहेर खेचून काठीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता यापुढे नादी लागला तर जीवे मारून टाकू, अशी धमकीही दिली. ही घटना असोला जहाँगिर (ता. देऊळगाव राजा) येथे काल, 8 जूनच्या सायंकाळी साडेसहाच्या …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवैध मुरुम उत्‍खननाची तक्रार केल्याने स्‍थापत्‍य अभियंता असलेल्या 34 वर्षीय युवकाच्‍या कारवर सहा जणांनी हल्ला चढवला. कारमधून बाहेर खेचून काठीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता यापुढे नादी लागला तर जीवे मारून टाकू, अशी धमकीही दिली. ही घटना असोला जहाँगिर (ता. देऊळगाव राजा) येथे काल, 8 जूनच्‍या सायंकाळी साडेसहाच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी आज देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याने सहा जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ विश्वनाथ शेळके (34, रा. असोला जहाँगिर) असे हल्ल्यात जखमी झालेल्या अभियंत्‍याचे नाव आहे. तो सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे ठेकेदारी पध्दतीने करतो. काल सिंदखेड राजा येथून कारने (क्र. MH46 AP0348) ते येत होते. असोला जहाँगिर गावाजवळील नदीच्‍या पुलाचे काम चालू असून, समोरून चारचाकी वाहन आल्यामुळे कार बाजूला घेऊन रोडच्या काठावर थांबलेल्‍या आसाराम धोंडिबा शेळके यांना एकनाथ शेळके यांनी बाजूला सरका, गाडीचा धक्का लागेल… असे सांगितले. तेव्‍हा तुझीच गाडी बाजूला घे, असे म्हणून आसाराम शेळके शिविगाळ करू लागले. एवढ्यावरच न थांबता त्‍यांनी दगड उचलून कारवर टाकला. त्‍यामुळे घाबरून एकनाथ शेळके यांनी कार तिथून वेगाने गावात नेली.

15 मिनिटांनंतर ते गावाजवळ आले असता रस्त्यावर अनिल खुशालराव शेळके, अनिल विठोबा शेळके, महादेव दत्तात्रय शेळके, सुरेश भास्कर शेळके, शिवाजी सुरेश शेळके यांनी कार अडविली. कारबाहेर एकनाथला ओढून काढले व लाथाबुक्‍क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरड ऐकून एकनाथचे चुलतभाऊ नवल छत्रपती शेळके व विलास विश्वनाथ शेळके धावून आले. त्‍यांनी एकनाथला वाचविण्याचा प्रयत्‍न केला असता अनिल विठोबा शेळके याने काठीने एकनाथला मारले. नवल शेळके याच्‍या कपाळावर आसाराम शेळके याने काठी मारली. हाणामारी सुरू असतानाच गजानन गिनानदेव शेळके, प्रविण दामोधर शेळके, विलास विश्वनाथ शेळके यांनी भांडण सोडवत एकनाथ आणि त्‍याच्‍या भावांना वाचवले. यावेळी आसाराम शेळके याने यापुढे आमच्‍या नादी लागला तर जिवाने मारून टाकीन, अशी धमकी दिली.

हल्ल्याचे हे आहे कारण…
आसाराम शेळके याच्‍याविरुध्द एकनाथने तहसील कार्यालयात अवैध मुरूम उत्खननाची तक्रार दिली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी वारंवार तो धमकावत असून, त्याच कारणामुळे त्याने मला मारहाण केली. कारवर दगड टाकून नुकसान केले, असा आरोप एकनाथने तक्रारीत केला आहे.