रेकॉर्डब्रेक! तब्बल 579 पॉझिटिव्ह!!; चिखलीत कोरोना सुसाट, दिडशतक गाठले!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोना सुसाट सुटला असून, आज, 9 मार्चला रेकॉर्डब्रेक 579 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जेमतेम 24 तासांत पावणे सहाशे रुग्ण म्हणजे गंभीर धोक्याची घंटा ठरावी.
जिल्ह्यात गत् 4 दिवसांपासून 400 ते 415 या सरासरीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. मात्र काल कोरोनाने हद्द ओलांडत 500 चा आकडा ओलांडला! महिला दिनी 517 वर असलेल्या कोरोनाने आज 600 घरात मजल मारत आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन यासह 25 लाखांवर जिल्हावासीयांना अलर्ट केले. कोरोना हॉट स्पॉट ठरण्याच्या दिशेने मजल मारणाऱ्या चिखली शहर व तालुक्याने आज 9 मार्चला दीड शतकीय खेळी करत तालुकावासीयांना हादरविले! तालुक्यात 151 पॉझिटिव्ह निघाले आहेत. चिखलीशी चुरशीची झुंज देणारे(!) बुलडाणा 68 व खामगाव 60 हे तालुके फारसे मागे नाहीत. मात्र गत काही दिवसांपासून 25 ते 40 दरम्यान रेंगाळणाऱ्या शेगाव तालुक्यात 68 पॉझिटिव्ह आढळून आले. 24 तासांतील हे आकडे धोक्याची घंटा मानली जात आहेत. देऊळगावराजा 49, मेहकर 39, मलकापूर 39 नांदुरा 27 या तालुक्यांचा पिच्छा सोडायला कोविड तयार नाही हे उघड आहे. या तुलनेत जळगाव जामोद 21, लोणार 13, सिंदखेडराजा 25, संग्रामपूर 15 या तालुक्यांतील आकडे किमान आजतरी कमी आहेत. मोताळ्यातील लक्षणीय घट( 4 रुग्ण) आजचा एकमेव दिलासा ठरावा.
पॉझिटिव्हीटी दर वाढला…
दरम्यान अहवालाच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर वाढल्याचे गंभीर चित्र आहे. आजचा हा दर तब्बल 23.16 टक्के इतका आहे. आजवरचा( प्रगती पथावरील) हाच रेट 12,13 टक्के इतका राहिला आहे. यामुळे हा दर गंभीर असाच ठरणारा आहे.