बुलडाणा शहरवासियांनो सावधान! कोरोनाचा धोका कायम! 20 दिवसांतच आढळले तब्बल 189 रुग्ण!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत् वर्षात भंडावून सोडणार्या कोरोनाच्या जाचातून जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराची सुटका झाली, असा शहरवासीयांचा गोड गैरसमज असेल तर तो साफ चुकीचा आहे! नवीन वर्षात शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जेमतेम 20 दिवसांत केवळ शहरातच तब्बल 189 कोविड रुग्ण आढळून आले आहेत. सरत्या वर्षात बुलडाण्यात रुग्ण …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत् वर्षात भंडावून सोडणार्‍या कोरोनाच्या जाचातून जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराची सुटका झाली, असा शहरवासीयांचा गोड गैरसमज असेल तर तो साफ चुकीचा आहे! नवीन वर्षात शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जेमतेम 20 दिवसांत केवळ शहरातच तब्बल 189 कोविड रुग्ण आढळून आले आहेत. सरत्या वर्षात बुलडाण्यात रुग्ण कमी होत असल्याचे सुखद चित्र होते. मात्र नवीन वर्षातही कोरोनाने शहराचा पिच्छा सोडला नसल्याचे गंभीर चित्र आहे.

हॅप्पी न्यू इअरलाच आलेले 14 रुग्ण या संभाव्य धोक्याचा इशारा देणारे होते. मात्र मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याला बहुतेक नागरिकांनी घटस्फोट दिलाय! तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शहरात गर्दी वाढली. मलकापूर रोड ते चिखली स्टॉप, कारंजा चौक ते इकबाल चौक, आठवडी बाजार ते सिनेमागृह परिसर अशा विस्तीर्ण पट्ट्यात भरणार्‍या आठवडी बाजारात नागरिकांच्या या बेजबाबदरपणाचा कळस दिसून येतो. हजारो ग्राहकच काय विक्रेते सुद्धा साधं मास्क देखील घालत नाहीये. आता पालिका पथकाच्या दंडाची देखील भीती उरली नाहीये. यामुळे शहरात कोरोना सुसाट सुटलाय. नवीन वर्षाच्या पहिल्या 13 दिवसांतच (1 ते 13 जानेवारीदरम्यान) रुग्ण संख्येने सेंच्युरी पार करत 107 चा आकडा गाठला. यानंतरही नॉट आउट असलेल्या कोविडने पुढील एका आठवड्यातच 89 जणांना कोरोनाने कवेत घेतले. 14 ते 20 जानेवारी दरम्यानचा हा आकडा. यातही कळस म्हणजे केवळ 17 जानेवारीचा 3 रुग्ण व 16 तारखेचा 5 रुग्ण अपवाद वगळला तर इतर दिवशी रुग्णांचा आकडा दुहेरीच आहे. 14 व 15 जानेवारीला प्रत्येकी 10 रुग्ण , 18 जानेवारीला 19 रुग्ण, 19 जानेवारीला 17 तर आज 20 जानेवारीला 18 रुग्ण आढळले आहेत. या वाढत्या धोक्याकडे आरोग्य यंत्रणाच नव्हे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते.