बुलडाणा ठरलंय हॉटस्पॉट! 2 आठवड्यांतच 753 पॉझिटिव्ह!!, दोनदा ओलांडला शंभरचा आकडा
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा मुख्यालय असलेले बुलडाणा शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले असून, गत 14 दिवसांतच तब्बल 753 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या सामूहिक संसर्गासदृश्य स्थिती आटोक्यात आणण्याचे कडवे आव्हान आरोग्य यंत्रणासमोर उभे ठाकले आहे.
फेब्रुवारीत बुलडाणा शहर परिसरात कोरोनाने कमबॅक केले. जिल्हा मुख्यालयात क्रमाक्रमाने वाढणाऱ्या कोविडने पाहता पाहता गंभीर रूप धारण केले. यामुळे बुलडाणा शहराला फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. याउप्परही मार्चमध्ये या अदृश्य शत्रूने विक्राळ स्वरूप धारण केले. 1 मार्चला 21, 2 मार्चला 47, 3 मार्चला 35, 4 मार्चला 34 व 5 मार्चला शहरात 7 रुग्ण आढळले. मात्र 5 मार्चला त्याने एकदम 105 चा आकडा गाठला! यानंतर आज 14 मार्चला विक्रमी 108 रुग्ण आढळल्याने शहरावरील धोका पुन्हा सिद्ध झाला. मध्यंतरी 7 मार्चला 40, 8 मार्चला 78, 9 मार्चला 37, 10 मार्चला 62, 11 मार्चला 67, 12 मार्चला 78, तर 13 मार्चला 34 रुग्णांची नोंद झाली. जेमतेम 14 दिवसांत साडेसातशेहून अधिक कोरोना बाधित आढळले असून, या कालावधीत दिवसाकाठी 54 रुग्ण या सरासरीने रुग्ण वाढत आहेत.