पुन्हा उसळी!, तब्बल 661 पॉझिटिव्ह!! बुलडाणा दीड शतकाच्या पार, मलकापूर नाबाद 108 ,नऊ तालुक्यांतील संख्या वाढली!!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः शनिवार एरवी घातवार मानला जातो. त्यात तो 13 या अशुभ आकड्याच्या जोडीने आला होता. मात्र कालच्या शनिवारने हे थोतांड ठरविले. काल बहुतेक तालुक्यांसह जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी आला. मात्र आजचा रविवार, 14 मार्च घातवार ठरलाय! जिल्ह्यात तब्बल 661 पॉझिटिव्ह आढळले असून, 9 तालुक्यातील रुग्णसंख्या धोकादायक आहे.
मागील काही दिवसांच्या तुलनेत शनिवारी कोरोना बाधितांच्या आकड्यात किंचित घट झाली. पॉझिटिव्हची संख्या 362 इतकी असली तरी ती तुलनेने कमी ठरली. मात्र आजचा दिवस 14 मार्च हा कालचा दिलासा काही तासांचा होता से सिद्ध करणारा ठरला. बुलडाणा तालुक्याने पुन्हा चिखलीला मागे टाकत जिल्ह्यात आघाडी घेतली. बुलडाण्यात तब्बल 160 पॉझिटिव्ह आढळले आहेत. मलकापूर तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आली असे वाटत असतानाच आज कोरोनाने कमबॅक करत शासकीय आकडा (108) गाठला. काही दिवसांपासून जेमतेम दुहेरी आकडा गाठणाऱ्या मेहकर तालुक्यात वीस तीस नव्हे तब्बल 72 पॉझिटिव्ह आलेत. शेगाव 57, देऊळगावराजा 47,नांदुरा 39, सिंदखेड राजा 22, लोणार 12 संग्रामपूर 10 यांची काही दिवसातील गती समान आहे. चिखली 41, खामगाव 46 या तालुक्यांतील संख्या तुलनेने कमी आहे. मोताळा 1, संग्रामपूर व लोणारमधील संख्या आटोक्यात आहे की चाचण्यांचा वेग कमी आहे हा संशोधनाचा विषय ठरावा.