चाचण्या वाढल्या, रुग्णही वाढले! आज जिल्ह्यात 567 पॉझिटिव्ह, खामगाव दीडशेच्या घरात! बुलडाण्याची शतकाची मालिका कायम!!
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी) : गत तीनेक दिवसांपासून मंदावलेला नमुने संकलन व कोरोना विषयक चाचण्यांचा वेग वाढविण्यात आल्याने आज, 16 मार्चला कोरोनाबाधितांचा आकडादेखील वाढल्याचे दिसून आले. गत 24 तासांत जिल्ह्यात 567 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
‘बुलडाणा लाईव्ह’ने कोरोना रुग्णांची वाढती संख्या व धोक्यावर सातत्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांचे लक्ष वेधले. यामुळे व एकूणच कोरोना उद्रेक वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्व आरोग्य यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीत एस. रामामूर्ती यांनी चाचण्यांचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले. परिणामी मोठ्या संख्येने स्वॅब नमुने संकलन करण्यात आले. तसेच चाचण्यांचा वेगही वाढविण्यात आला. यामुळे आज तब्बल 2850 अहवाल प्राप्त झालेत. मात्र हा तांत्रिक दिलासा सोडला तर अन्य कोणताही दिलासा देण्याचा दिलदारपणा खडूस कोविडने नाय दाखविला! यामुळे आकडा पुन्हा साडेपाचशे वर गेलाय.
खामगावची आघाडी, मेहकरात मुसंडी
दरम्यान, बुलडाणा तालुक्यासमवेत चुरस करणाऱ्या खामगावने आज जवळपास दीड शतक गाठले! तालुक्यात आज तब्बल 147 रुग्ण आढळले. बुलडाणा तालुकासुद्धा मागे नसून, 118 रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र मेहकरमध्ये कोरोनाने पुन्हा उचल खाल्ली असून, आज 52 पेशंट निघाले. देऊळगावराजा 53, चिखली 38, नांदुरा 35, मलकापूर 26 या तालुक्यांना दिलासा द्यायला कोविड तयार नाय हे दिसून आले. आघाडीवर असलेल्या शेगावमध्ये अवघे 5 रुग्ण आढळले. मात्र जळगाव जामोद 31, सिंदखेड राजा 25 या तालुक्यातील संख्या वाढल्याचे दिसून आले. या तुलनेत संग्रामपूर 19, मोताळा 6, लोणार12 हे तालुके बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहेत. हे झाले आजचे पण उद्याचे सांगता येत नाही हे चित्र लहरी हवामान सारखे वागणाऱ्या कोरोना कडेच आहे.