कडक निर्बंधांतील फोलपणा सिद्ध! 24 तासांत नव्‍या 1140 ‘पॉझिटिव्ह’ची भर; बुलडाण्यासह 10 तालुक्यांत कोरोनाचा स्फोट

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 14 एप्रिलला लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांना कोरोनाने दुसऱ्या दिवशीही वाकुल्या दाखवत प्रशासनाची फिरकी घेतली! आज, 16 एप्रिलला सहाशे-सातशे नव्हे तब्बल 1140 कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या निर्बंधातील फोलपणा सिद्ध झाला आहे. गत् 24 तासांत केवळ बुलडाणाच नव्हे तर तब्बल 11 तालुक्यांत कोरोनाचा स्फोट झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 14 एप्रिलला लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांना कोरोनाने दुसऱ्या दिवशीही वाकुल्या दाखवत प्रशासनाची फिरकी घेतली! आज, 16 एप्रिलला सहाशे-सातशे नव्हे तब्बल 1140 कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या निर्बंधातील फोलपणा सिद्ध झाला आहे. गत्‌ 24 तासांत केवळ बुलडाणाच नव्हे तर तब्बल 11 तालुक्यांत कोरोनाचा स्फोट झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. यामुळे लॉकडाऊन व कर्फ्यू पलीकडे काही विचारच ना करणाऱ्या यंत्रणांना या महाआकड्यांनी सणसणीत चपराक बसल्याचे मानले जात आहे.
14 एप्रिलपासून संचारबंदी, लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू असे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात मोजके अपवाद वगळता व्यापार अन्‌ व्यापारी लॉक, अर्थव्यवस्था डाऊन अन्‌ नागरिक, वाहनधारक रस्त्यावर सुसाट, मोकाट असे विचित्र चित्र पहावयास मिळत आहे. यातच निर्बंध लावूनही कोविडचे आकडे कमी व्हायचे नाव घेत नाहीये! घोषणेच्या दुसऱ्या दिवशीच 1140 पॉझिटिव्हचा आकडा म्हणजे निर्बंधांची मस्करीच म्हणता येईल. बुलडाणा तालुका मोठ्या आकड्याने गाजतोय. आज 219 रुग्णांचा आकडा आलाय. मात्र फक्त बुलडाणाच नव्हे तर त्यासह 11 तालुक्यांत कोविडने यंत्रणांची थट्टा करत धुमाकूळ घातलाय! खामगाव 124, मेहकर 154, मलकापूर 132, मोताळा 113, देऊळगाव राजा 90, सिंदखेड राजा 81, चिखली 77, नांदुरा 52, शेगाव 42 हे महानिर्बंधांमधील महा आकडे यातील फोलपणा दर्शवितात. लोणार 33, संग्रामपूर 23, जळगाव जामोद 3 हा दिलासा माननाऱ्यांनी मानावा. जर सर्वच लॉक तर मग कोरोना मोकाट का, याचं उत्तर रोज आढावा घेणाऱ्या यंत्रणांनी मुळापर्यंत जाऊन शोधण्याची गरज आहे. आता, कर्फ्यू, 144 कलम आणि लॉकडाऊनमध्येच सर्व समस्यांची उत्तरे शोधणाऱ्या यंत्रणांकडून याची अपेक्षा करावी काय हा जिल्हावासीयांचा ऐच्छिक व वैयक्तिक प्रश्न आहे.
4 बळी
दरम्‍यान, गेल्या 24 तासांत कोरोनाने आणखी 4 बळी घेतले असून, त्‍यामुळे एकूण बळींचा आकडा 322 वर गेला आहे. आजच्‍या बळींतील 2 बळी बुलडाण्यातील महिला रुग्णालय, 1 बळी लद्धड हॉस्पिटलमध्ये तर खामगावच्‍या सामान्य रुग्णालयात 1 बळी गेला आहे.