आज 1080 पॉझिटिव्ह रुग्णांची भर! नांदुऱ्यात कोरोनाचा विस्फोट; 12 तालुक्यांत उद्रेक; चौघांचा मृत्यू
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोनाचा विस्फोट कायम असून, गत् 24 तासांत पुन्हा चार आकडी म्हणजे 1080 इतकी रुग्ण संख्या निघाली आहे. नांदुऱ्यासह 12 तालुक्यांत कोरोनाचा उद्रेक कायम असल्याचे भीषण चित्र आहे.
काल, शुक्रवारी 1036 पॉझिटिव्ह निघाले असतानाच आज शनिवारी हा आकडा 1080 वर पोहोचला आहे. नांदुऱ्यात कोरोनाचे तब्बल 187 रुग्ण निघाल्याने आरोग्य यंत्रणा हादरल्या! शेजारील मलकापूर तालुक्याने 80 चा आकडा गाठला. यामुळे केवळ मलकापूर मतदारसंघातच अडीचशेवर रुग्ण निघाले आहेत. मेहकरात 133 तर लोणारमध्ये 78 अशी रुग्णसंख्या आहे. बुलडाणा 123, खामगाव 99, देऊळगाव राजा 82, सिंदखेडराजा 88, जळगाव जामोद 68, मोताळा 43 अशी बधितांची भरमसाठ संख्या आहे. तुलनेने शेगाव (12) मधील तीव्रता कमी झाल्याचे सुखद चित्र आहे. संग्रामपूरमध्ये 1 पेशंट निघणे देखील बातमी ठरते. यामुळे 2 तालुके सोडले तर संपूर्ण जिल्हा कोरोना भरोसे असेच चित्र आहे. 7065 नमुने संकलन, 6749 अहवाल अन् 5610 निगेटिव्ह हा आकड्यांचा खेळ ठरला आहे. मात्र आज चौघांचे मृत्यू होणे सामान्यांसाठी गंभीर बाब ठरतेय. बुलडाणामधील महिला रुग्णालयातील 3 आणि शेगाव सामान्य रुग्णालयातील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.