बसस्थानक कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडले; आरोपी सीसीटीव्हीत कैद, बुलडाणा शहरातील घटना!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक संगम चौक परिसरातील बसस्थानक कॉम्प्लेक्समध्ये ५ ऑक्टोबर रोजी रात्री माऊली मोबाईल शॉपी फोडून ५० हजारांचा ऐवज लंपास झाल्याची घटना ६ ऑक्टोबर २०२४ रोजी उघडकीस आली. या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

माऊली मोबाईल शॉपीचे मालक किरण पाटील यांना सकाळी एक मोबाईल क्रमांकावरून फोन आला की, तुमचे मोबाईलचे दुकान कोणी तरी फोडले आहे. याबाबतची माहिती मिळताच किरण पाटील हे त्यांच्या मोबाईल दुकानाकडे गेले असून दुकानाचे शटर तोडून चोरांनी चोरी केल्याचे दिसले. १५ ते २० हजार रुपयांची रोकड व मोबाईल तसेच इतर साहित्य लंपास केल्याचे यावेळी दिसून आले.

तर सीसीटीव्हीची तपासणी केली असता चार आरोपी पैकी तिघांनी तोंडाला रुमाल बांधलेला आहे. एका आरोपीने तोंडाला रुमाल बांधलेला नसल्यामुळे आरोपी लवकरात लवकर ताब्यात घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरण पाटील यांनी याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.